
महाराष्ट्रात अनेक महान नेते होऊन गेले, ज्यांनी देशासाठी आपले आयुष्य पणाला लावले. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारखे नेते हे तमाम जनतेच्या गळ्यातील ताईत बनून राहिले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला शूर-वीरांची भूमी म्हणून प्रसिद्ध केले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याच शिवरायांचे भक्त बनून अखंड हिंदुस्थानचा पुरस्कार करताना इंग्रजी राजवटीला हलवून सोडले, त्याच शिवबाच्या मातीत त्याच शिवबाचा भक्त बनून आज जर कोणी महाराष्ट्राला किंबहुना मराठी माणसाला मान-सन्मानाने जगायला शिकवले असेल तर ते हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनीच!
व्यंगचित्रकार एवढा मोठा नेता बनू शकतो हे कदाचित जगातील एकमेव उदाहरण असेल. इतर नेत्यांवर व्यंगात्मक कला चितारुन त्याच क्षेत्रात काम करणे हे फारच कठीण आहे. पंडीत जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई यांच्यासारखे नेते भरात असताना त्यांच्यावर व्यंगचित्र काढणे हे सोप्पे नव्हते, पण शिवरायांच्या भूमीत जन्माला आलेला मराठी माणूसच हे करु शकतो हे बाळासाहेबांनी दाखवून दिले. ‘मार्मिक’ या व्यगंचित्र साप्ताहिकाच्या माध्यमातून ‘शिवसेना’ नावाची मर्दांची संघटना बाळासाहेबांनी प्रबोधनकारांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केली. शिवसेनेचे वय आज ४५ वर्षे जरी असले आणि स्थापनेपासून काम करणारे शिवसैनिक हे कायम तरुणच असतात, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.
४५ वर्षांपैकी जवळ जवळ ४० वर्षे सत्ता नसतानाही आक्रमक संघटना कशी टिकू शकते हे अनेकांना पडलेले कोडे आहे. तात्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनीही शिवसेना संपविण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले असे आजही वाचनात येते, एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या प्रयत्नांनी शिवसेना संपू शकली नाही याचा अर्थ यात कुठेतरी दैवी शक्ती असलीच पाहिजे असे मानले तरी हरकत नाही. आजही काहीजण शिवसेना संपविण्याची कोल्हेकुही करत असतात पण या चिटपाखरांना ४२ पिढ्याही शक्य होणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे.
बाळासाहेबांनी शिवसेनेत नुसती माणसांची भरती केली नाही तर निष्ठावान मावळ्यांची फौज स्वत:च्या जादुई नेतृत्वाने उभी केली. बाळासाहेब वयाने थकले असले तरी त्यांची जादु आम्हा तरुणांवर कायम आहे. अनेकजणांना साहेबांची भाषण ऐकता आली नाहीत परंतु जे काही वाचून कळते त्यावरुन साहेबांचे मोल आम्हा तरुणांसाठी फार मोठे आहे. ‘जिथे पिकते, तिथे विकले जात नाही’ ही म्हण मराठी माणसासाठी चपखल लागू पडते. शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून ते दादोजी कोंडदेवांपर्यंत आपण इतिहास जगण्यापेक्षा त्यावर वादच करत बसलो. बाळासाहेबांसारखे आधुनिक आणि प्रगतीशिल नेतृत्व असतानाही आमच्या महाराष्ट्राने संधी दिली ती केवळ साडेचार वर्षासाठीच! त्याही साडेचार वर्ष मिळालेल्या संधीचे सोने करुन साहेबांनी अनेक विकासकामे करुन दाखविली. शिवशाही सरकारच्या कामांमध्ये प्रामुख्याने मुंबईतील ५५ उड्डाणपुल, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वरळी सागरीसेतू ही कामे आहेतच, तसेच सर्वसामान्यापर्यंत सरकार पोहचले पाहिजे यासाठी अनेक सरकारी उपक्रम कोकणासारख्या मागासलेल्या भागात आणले. आजच्या तरुणाला प्रगती आणि विकास या दोन गोष्टी महत्वाच्या वाटतात, बाळासाहेबांनी मुळात त्या शिवसेनेत यापूर्वीच राबविलेल्या आहेत. मुंबईमध्ये मागची अनेक वर्षे महानगरपालिकेत सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर असल्याने सिद्ध करुन दाखविले आहे. महानगरपालिकेकडे असलेले मर्यादित अधिकार बघता देशातील इतर महानगरपालिकांमध्ये मुंबई कैक पट पुढे आहे.
बाळासाहेब हे तरुणांचे आदर्श नेते आहेत आणि कायमस्वरुपी राहणार आहेत. स्पष्ट बोलणारा माणूस राजकारणात स्वकर्तुत्वावर टिकू शकतो हे साहेबांनी दाखवून दिलेय पण त्यामुळे अनेकांची गोचीही झालेली आहे. बाळासाहेबांचेच जुने मित्र शरद पवार हे एकेकाळी साहेबांच्या स्पष्टवक्तेपणामुळे साहेबांपासून लांब गेले होते. अनेकजण साहेबांच्या याच स्वभावामुळे जवळ यायला तयार होत नाहीत. साहेबांनी शिवसैनिकांवर जेवढे प्रेम केले तेवढे कुणावरच केले नसेल. जगातील कुठल्याही पक्षातील कार्यकर्त्याला समाजात मान नसेल इतके मान शिवसैनिक म्हणून मिळते हा आम्हा शिवसैनिकांचा अनुभव आहे. पैसा-संपत्ती या मोहात न पडता केवळ मराठी अस्मितेचे जतन झाले पाहिजे यासाठी अनेक मोठ्या लोकांशी साहेबांनी पंगा घेतला. परंतु स्वत:च्या विचारांशी आजही कायम प्रामाणिक राहिले आहेत.
बाळासाहेबांसारखे नेतृत्व हे अनेक वर्षांनी जन्माला येते. बाळासाहेबांच्या भाषणाची नक्कल करुन, वेगळे दुकान मांडून, मराठी माणसाच्या विश्वासाचा वापर स्वत:चे पोट भरण्यासाठी केलेले काही स्वयंभू नेते साहेबांच्या कुटूंबातच जन्माला आले हे सर्वांचे दुर्भाग्य आहे. परंतु बाळासाहेबांनी दिलेला विचार आचरणात आणण्याचे काम केवळ शिवसैनिकालाच जमते. घरदार सोडून शिवसेनेसाठी झोकून देणारे शिवसैनिक साहेबांना मिळाले एवढे भाग्य लाभलेला नेता क्वचित असेल.
आज बाळासाहेबांचा वाढदिवस, साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर अनेकजण लिखाण करत असतात, वर्तमानपत्रांमध्ये पुरवण्या निघतात. माझाही तसाच मोडक्या-तोडक्या भाषेतील हा लेख माझ्या ब्लॉगवर लिहित आहे. आमच्या साहेबांना अखंड निरोगी आयुष्य लाभो, ही आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि साहेबांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा देतो.
No comments:
Post a Comment