Saturday, August 28, 2010

दादोजी कोंडदेव पुतळ्याचे राजकारण

अनेकांच्या तप्त ठिणग्यांतून शिवरायांच्या इतिहासाची ज्वाला भडकली. त्यातील एक ठिणगी दादोजी कोंडदेवनामक पात्राचीदेखील आहे.


इतिहास म्हणजे बाजारचा भाजीपाला नव्हे!
दादोजी कोंडदेव
एक गाव आणि बारा भानगडी तसे सध्या आपल्या इतिहासाचे झाले आहे. ज्यास आम्ही किंवा आपण सारे प्रेरणादायी पुरुष म्हणून पुजतो किंवा एखाद्या प्रसंगापुढे नतमस्तक होतो तो पुरुष किंवा प्रसंग घडलाच नाही, इतिहासाच्या पानावरून अशा पुरुषांना आणि प्रसंगांना हटवा, अशा मागण्यांची उबळ महाराष्ट्रात अधूनमधून उठत असते. जातनिहाय जनगणना सुरू होण्यास वेळ आहे. मात्र इतिहास व समाजपुरुषांचे जातनिहाय वाटप महाराष्ट्रातील राजकीय पुढार्‍यांनी करून टाकले आहे व त्यानुसार युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांवर ‘जात’ म्हणून मराठा समाजाच्या काही संघटनांनी शिक्का मारला आहे. अशा शिक्काबाजांना दादोजी कोंडदेवांच्या बाबतीत जो वात आला आहे व इतिहासाच्या पानांवरून दादोजींना हटविण्याची जी मागणी त्यांनी केली आहे तो निव्वळ मूर्खपणाच म्हणायला हवा. या चवचाल इतिहास संशोधकांचे म्हणणे आहे की, इतिहासात, खासकरून शिवरायांच्या जीवनकार्यात दादोजी कोंडदेव हे पात्रच अस्तित्वात नव्हते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंसारख्या मंडळींनी म्हणे मारून मुटकून दादोजींचे पात्र निर्माण करून त्यांना शिवरायांचे गुरू बनविले आहे. त्यामुळे इतिहासाच्या पानांवर कोंडदेवांचे नावही असता कामा नये. पुण्यातील लाल महालात दादोजी कोंडदेवांचा जो पुतळा आहे तो तेथून ताबडतोब हलवावा, नाहीतर मोठे आंदोलन करू, अशा धमक्या काही संघटनांनी दिल्या. पुण्याच्या महापालिकेत त्यावर गोंधळ झाला. परिणामी पुण्याच्या महापालिकेतही दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटविण्याचे आश्‍वासन देण्यात आले. पुण्यातील प्रतापाचे पडसाद महाराष्ट्राच्या मंत्रालयातही उमटले व शंकरराव चव्हाणांचे मुख्यमंत्री पुत्र अशोकराव चव्हाण यांनी या प्रश्‍नी कोणतीही ठोस भूमिका न घेता ‘हा प्रश्‍न पालिकेच्या अखत्यारीत येतो. दादोजींचा पुतळा हलवायचा की ठेवायचा याबाबतचा निर्णय त्यांनीच घ्यावा’ अशी मखलाशी करून स्वत:ची कातडी वाचवली आहे. कोंडदेवांचा पुतळा पालिकेच्या अखत्यारीत येतो हे मान्य. मग पुणे महापालिका व परिसर हे निजामाचे स्टेट असून त्यावर मुख्यमंत्र्यांचा अधिकार चालत नाही असे चव्हाणांना म्हणायचे आहे काय? शिवाजी महाराजांचा
इतिहास हा पोरखेळ नाही
व राजकारण्यांची टोलवाटोलवी नाही. शिवरायांच्या इतिहासातील सर्वच पात्रे ही जेथच्या तेथेच असायला हवीत. त्यांना हलविण्याचा अधिकार कुणालाही नाही. काही पात्रे व त्यांच्या विषयीच्या कथा दंतकथा कुणा टोळक्यास मान्य नसतील तर तो त्यांचा प्रश्‍न. गागा भट्ट, दादोजी कोंडदेव हे जन्माने ब्राह्मण म्हणून शिवरायांच्या इतिहासात त्यांना स्थान नाही असे सांगणारे हे टिकोजीराव कोण? इतिहास हा भाकडकथांनी बनत नाही, तर शौर्याने व चांगल्या आचरणाने बनत असतो. दादोजी कोंडदेव हे इतिहासातील असेच एक शक्तिस्थान आहे व ते राहणार. ज्याने शिवरायांचे जबरदस्त असे वर्णन केले तो उत्तर प्रदेशचा कवी कुलभूषणही ब्राह्मणच होता व त्याने शिवरायांबद्दल जे लिहिले ते पुढे कुणालाही जमले नाही.
काशी की कला जाती
मथुरा की मस्जीद होती
अगर शिवाजी न होता
तो सुन्नत सबकी होती
कवी भूषण यांनी शिवरायांच्या शौर्यावर हे कवन लिहिले, पण भूषण हा ब्राह्मण होता म्हणून त्याच्या लिहिण्यावर, बोलण्यावर विश्‍वास कसा ठेवायचा? असे जातपंचायतीच्या नव्या इतिहास संशोधकांना वाटते काय? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र लोकप्रिय केले, घराघरांत नेले, सातासमुद्रापलीकडे नेले. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. शिवशाहिरांनी ‘शिवचरित्र’ लिहिण्याआधीपासूनच दादोजी कोंडदेवांचे अस्तित्व शिवरायांच्या इतिहासात आहे. जन्माने ब्राह्मण असलेल्या लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली व त्यावेळच्या मेळ्यांतून होणार्‍या व्याख्यानांतही दादोजी कोंडदेवांच्या कथा सांगितल्या जात होत्या. बाबासाहेब पुरंदर्‍यांचा जन्म त्यानंतरचा आहे. छत्रपती शिवरायांनी त्यांच्या हयातीत कधी जातीचे राजकारण केले नाही. शिवरायांच्या स्वराज्यात सर्वच होते, पठाणही होते. सर्वांना सोबत घेऊनच त्यांनी राज्यकारभार केला. म्हणूनच शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे महापुरुष ठरतात. शिवसेनेनेदेखील जात-पात, धर्म-पंथ असा भेद कधी केला नाही. ‘मराठा-मराठेतर, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, घाटी-कोकणी, शहाण्णव कुळी-ब्याण्णव कुळी हे वाद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारा’
हाच शिवसेनेचा विचार
सुरुवातीपासून राहिला आहे. आजही तोच विचार शिवसेना जपत आहे. किंबहुना सर्वांनीच तो जपायला हवा. मात्र दुर्दैवाने तसे घडताना दिसत नाही. सध्याचे राज्यकर्ते शिवरायांचे नाव उठताबसता घेतात, पण कारभार नेमका त्या विपरीत करीत आहेत. शिवरायांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करणार्‍यांचे कान उपटण्याऐवजी गोलमाल भूमिका घेत आहेत. ब्राह्मणांचा द्वेष म्हणजे ‘शिवचरित्र’ नाही हे मुख्यमंत्र्यांनी बजावून सांगायला हवे होते. पण मुख्यमंत्रीच लपाछपीचा खेळ करीत आहेत. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी तलवार गाजवली, शस्त्रे चालविली, बॉम्ब बनवले, क्रांतीच्या ज्वालेत स्वत:च्या आयुष्याचा होम केला ते बहुसंख्य ब्राह्मण किंवा दलित समाजातले वीर होते. 1857 च्या बंडाचा सेनानी तात्या टोपे, वीर नानासाहेब पेशवे, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, बॉम्बचे तंत्र हिंदुस्थानात आणणारे सेनापती बापट, देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर गेलेले एकाच घरातले तीन सख्खे चापेकर बंधू हेसुद्धा जातीने ब्राह्मण व कर्माने क्षत्रिय होते. हे सर्व क्रांतिकारक जातीने ब्राह्मण होते म्हणून इतिहासाच्या पानांवरून त्यांची नावे पुसायची व त्यांचे पुतळे कोणाला पाडायचे आहेत काय? झाशीची राणी ब्राह्मण म्हणून तिचे शौयर्र् काही लोकांना मान्य नाही. समर्थ रामदास यांना शिवरायांचे गुरू मानायला काही टोळभैरव तयार नाहीत. इतिहास म्हणजे बाजारचा भाजीपाला नसून जिद्द, रक्त व शौर्य यांच्या ठिणगीतून व बलिदानातून निर्माण झालेली ती जबरदस्त ज्वाला आहे. ती ज्वाला विझवता येणार नाही. अनेकांच्या तप्त ठिणग्यांतून शिवरायांच्या इतिहासाची ज्वाला भडकली. त्यातील एक ठिणगी दादोजी कोंडदेवनामक पात्राचीदेखील आहे. चंद्राला देव मानणार्‍यांना शेवटी तेथे दगडधोंडेच आढळले. म्हणून चंद्राची पूजा करायची कोणी थांबवले काय? ती सुरूच आहे. इतिहासातील अनेक पात्रांचे तसेच आहे. ज्यांना इतिहासाची इतकीच काळजी आहे त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी वाढणारे अफझलखानाचे थडगे व त्याचे उदात्तीकरण रोखावे. औरंगजेबाच्या थडग्यासमोर पढला जाणारा नमाज व हिरवा उत्सव थांबवावा. मराठ्यांच्या इतिहासाशी का खेळता?