Tuesday, May 17, 2011

जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रम (भाग ६)


आज २६ एप्रिल चेर्नोबिल अणुस्फोट दुर्घटनेला २५ वर्षे झाली. याच स्फोटात लाखो निरपराधांना आपले प्राण गमवावे लागले, इतकेच नव्हे तर आजही जन्माला येणारे सजीव व्यंग घेऊनच जन्माला येत आहेत. जपानच्या फुकुशिमामध्ये घडलेली दुर्घटना आपण पाहिलीच आहे. या दोन्ही घटना जैतापूरच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडत आहेत. सर्वसामान्यांना फक्त अणुऊर्जा देशाची गरज असल्याचे दाखवून जनतेचा पाठिंबा मिळवू पाहणारे सरकार याच्या दुष्परिणामांबद्दल का बोलत नाही? कोकणाकडे कधीही चांगल्या गोष्टींसाठी दुर्लक्ष करणारे सरकार यावेळेस मात्र मेहरबान झाल्याचे आव का आणत आहे, यातील दुष्परिणाम पाहता कोकण संपविण्याचा तर प्रयत्न यांचा नाही ना? अशा शंका घ्यायला वाव आहे.

जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रमया लेखमालिकेतील आजचा हा शेवटचा भाग. मागिल भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा व आता पुढे...

इतिहासाचा विकृत वारसा

दुस-या महायुध्दाच्या पार्श्वभूमीवर अणुबाँम्ब निर्मितीने वेग घेतला. याच काळात वैज्ञानिक इतिहासात प्रथमच वैज्ञानिकांचा, विशेषत: पदार्थविज्ञानाचा अणुशास्त्रज्ञांचा गुप्ततेशी संबंध आला. १९४० पासून लष्कराशी संबंध आल्यावर हा गुप्ततेचा पडदा अधिक गडद झाला. मुळातच हा लष्कराचा संबंध अनिष्ट होता. त्यातून आली सर्वंकष गुप्तता. जनतेच्या जीवनाशी, आरोग्याशी खेळ सुरू झाला. असा खेळ करण्याचा अधिकार यांना कुणी दिला?

त्या काळात हिटलरच्या आधी बाँम्ब बनविण्याच्या उद्दिष्टाने अनेक शास्त्रज्ञ भारावले होते. परंतु हिटलरच्या पराभवानंतर या उद्दिष्टाचे रूपांतर जेव्हा युध्द संपविण्याच्या आत बाँम्ब बनविण्यात आले तेव्हा आपली चुक शास्त्रज्ञांच्या लक्षात आली. पण तोवर वेळ निघून गेली होती. आता राजकारणी, लष्करी अधिकारी आणि अभियंत्यांना त्याचा कसेही करून वापर हवा होता. आणि लक्ष्य ठरला जपान, त्यातही त्यांचा नागरी विभाग. अमेरिकेचा पूर्वेकडील युध्द आघाडीचा उमदा सेनापती डग्लस मॅकार्थर हा खुद्द अण्वस्त्राच्या वापराच्या विरोधात होता. त्याने तीन महिन्यात जपानला शरण आणून युध्द समाप्ती करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अणुबाँम्ब बनविणा-या शास्त्रज्ञांसह सर्वांकडे दुर्लक्ष करून हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबाँम्बचा वापर केला गेला. मानवाच्या सर्वंकष दहशतीच्या आणि संहाराच्या सत्रात प्रवेश झाला. याच इतिहासाचा विकृत वारसा अणुक्षेत्रातील उच्चपदस्थ चालवितात.

हिरोशिमा, नागासाकीतील अणुबाँम्बच्या किरणोत्साराचे दुष्परिणाम पुढच्या पिढ्याही भोगत आहेत. यातच अणुऊर्जेची भीषणता आहे. अणु बाँम्बच्या वापरानंतर जगभरात अणुविरोधी लाच उसळली. परंतु तोपर्यंत या पाशवी शक्तीची राजकारणी आणि लष्करशहांना चटक लागली होती.

अणुभट्टयांतून प्लुटोनियनम या अधिक संहारक बाँम्बना जन्म देऊ शकणा-या समस्थानिकाची निर्मिती होत होती. म्हणून क्लुप्ती काढली गेली. शांततेसाठी अणुअशी नवी घोषणा जिनेव्हा येथील परिषदेत १९५५ साली दिली गेली. वीजेची निर्मिती हे केवळ निमित्त होते. कारण त्यामुळे भट्ट्या चालवता येणार होत्या. ती नगण्य असणार याची अणु प्रवर्तकांना पूर्ण जाणिव होती. दुर्दैवाने जगभरातील जनतेला आजही याची जाणीव नाही. आणि तथाकथित वीजनिर्मितीच्या विधायक वापराचा मुखवटा घालून अण्वस्त्रप्रसार मात्र जोरात चालू राहिला.

जैतापूर प्रकल्प आणि अणुकार्यक्रम हा देशासाठी कर्जाचा साफळा

मुळातच अणुऊर्जा अयोग्य आहे आणि जैतापूर प्रकल्प अनिष्ट आहे. त्यामुळे कोणती कंपनी हा प्रकल्प करणार हा प्रश्नच गैरलागु आहे. तरीही जनतेपर्यंत काही माहीती पोहचणे गरजेचे वाटते.

फ्रान्सची अरेवा ही सरकारी कंपनी हा प्रकल्प करू इच्छिते. या कंपनीची युरेनियम प्रेशराईज्ड रिएक्टर ही अणुभट्टी बांधण्याचा फिनलंड देशातील प्रयत्न त्या देशाला चांगलाच तापदायक ठरला आहे. त्या देशाच्या मंत्र्यांनी याबाबत पश्चात्ताप व्यक्त केला आहे. तेथील नुतनीकरणक्षम, प्रदुषणरहित ऊर्जास्त्रोतांसाठी ठेवलेला पैसा या अणुभट्टीमुळे खर्च झाला. विलंब वाढत गेला व खर्च अनेकपट झाला आहे. देश त्यात पोळून निघाला. फ्रान्सला फ्लॅमव्हिले भट्टीबाबत असाच अनुभव आला.

अरेवाच्या भट्टीत सुमारे २१०० दोष संबंधित यंत्रणेने दाखविले, ज्याचे स्वरूप धोकादायक आहे. फ्रान्सने अणुऊर्जादेखील कार्बन ऊत्सर्जन करते हे लपविले आहे. तरीही फ्रान्स देश क्योटो शिष्टाचाराने घालून दिलेले कार्बन ऊत्सर्जन कमी करण्याचे उद्दीष्ट पार पाडू शकला नाही. फ्रान्स वीज उत्पादनापैकी ७८ टक्के उत्पादन अणुऊर्जेद्वारे करते याचा वारंवार उल्लेख केला जातो. परंतु त्याच्या एकूण ऊर्जाउत्पादनात अणुवीजेचे प्रमाण फक्त १७ टक्के आहे हे सांगितले जात नाही. खर्चिक अणुऊर्जा कार्यक्रम हे फ्रान्सच्या गळ्यातील लोढणे ठरले आहे. युरोप व अमेरिकेत अणुऊर्जेविरोधात जनमत असल्याने हा उद्योग धोक्यात आला आहे म्हणून त्यांच्या कंपन्या चालू ठेवण्यासाठी भारताला बळीचा बकरा बनविला जात आहे. चेर्नोबिलपासून युरोपने, तर थ्रीमाईल्स दुर्घटनेपासून म्हणजे १९७९ पासून अमेरिकेने नव्या अणुभट्टी बांधणीचा कार्यक्रम हाती घेतला नाही.

सध्याच्या जैतापूरच्या फक्त सहा अणुभट्ट्यांसाठी देशाला एकूण एक लाख ऐंशी हजार कोटी रूपये मोजावे लागणार आहेत. इतर खर्च वेगळा होईल. हा पैसा कर्जरूपाने उभारला जाईल व अनायसे हा देश जागतिक बँकेच्या म्हणजे पर्यायाने अमेरिकेच्या दावणीला बांधला जाईल. त्यानंतर हे कर्ज फेडले जाणार नसल्याने अमेरिका व इतर पाश्चात्य देश भारताच्या नैसर्गिक संसाधनावर ताबा मिळविणार आणि अनेक धोरणे व निर्णय त्यांना हवे तसे घेण्यास भारताला भाग पाडणार. खरेतर हे सध्याच चालू आहे. संभाव्य भ्रष्ट्राचार हा मुद्दा आहेच. नुकतेच स्वीस बँकेच्या संचालकाने सांगितल्याचे प्रसिध्द झाले आहे की, काही भारतीयांचा २०० लाख कोटी रूपये एवढा पैसा स्वीस बँकेत जमा आहे. हा पैसा विकासकामांच्या पांघरुणाखालीच जमा झाला हे जनतेने लक्षात घ्यायला हवे. आर्थिक मारेक-याचा कबुलीजबाब (confessions of a economic hit man) या ग्रंथात लेखकाने प्रकल्प लादण्याची पध्दती उघड केली आहे.

चेर्नोबिलच्या नुकसानभरपाईची रक्कम तेव्हा सुमारे २५ लाख कोटी रूपये एवढी प्रचंड होती. भारतासारख्या दाट वस्तीच्या देशात काय घडेल त्याची कल्पना करावी. त्यामुळेत विमा कंपन्या अणुभट्ट्यांचा विमा उतरवीत नाहीत. कारण एखादा अपघात त्यांचे दिवाळे काढू शकतो. यातून भट्टी बांधणा-या कंपन्यांना वाचविण्यासाठी सरकारने संसदेत अलिकडे विधेयक संमत करून फक्त सुमारे दिड हजार कोटी रूपये ची मर्यादा घातली आहे. याचा अर्थ हा प्रचंड बोजा भारतीय जनतेवर पडणार शिवाय किरणोत्सारामुळे भावी पिढ्यांमध्ये होणा-या आजारांची जबाबदारी कोण घेणार?

एका एक हजार मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्टीत हिरोशिमासारख्या एक हजार अणुबाँम्बचा किरणोत्सार सामावलेला असतो. अणुभट्टी स्विकारणे म्हणजे कोकणवासियांनी रोज उशाशी हजारो अणुबाँम्ब घेऊन झोपण्यासारखे आहे. यातून यातील गांभिर्य लक्षात येईल. पंचवीस वर्षांपूर्वी घडलेल्या भोपाळ दुर्घटनेबाबतचा आपल्या सरकारचा लज्जास्पद अनुभव पाहता अणुअपघातामुळे काय हाहाकार होईल याची कल्पना करावी.

डॉ. गॉफमन यांनी उद्गार काढले आहेत की, अणुतंत्रज्ञानाला मानवी चेहरा नाही.
जैतापूरचे सत्य आणि अणुचा हा महाभ्रम ओळखून आपल्या भावी पिढ्यांच्या आणि जीवसृष्टीच्या निरोगी अस्तित्वासाठी निसर्गसमृध्द कोकणाच्या निकोप पर्यावरणासाठी कार्यरत होऊ. जैतापूर प्रकल्प रद्द करवून घेऊया आणि अणुचा महाभ्रम झुगारून देऊ या.

एक मुखाने गर्जा, नको अणऊर्जा

धन्यवाद,

आपला

गिरीश राऊत
फोन २४३७८९४८
दूरध्वनी ९८६९०२३१२७

समाप्त

जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रम (भाग ५)


चालू अणुभट्टी हीच एक सततची दुर्घटना!

दुर्घटना कायमची – कारण अणुभट्टी शांतपणे सुरु आहे असे वाटले तरी सतत किरणोत्साराचे उत्सर्जन व प्रसारण होत राहते. भट्टीपासून ३५ किमीच्या परिघात तर हा प्रभाव तीव्र असतो. भट्टीतील किरणोत्सारी वायु व द्रव्ये वातावरणात अधुन मधुन सोडली जातात त्यांना व्हेंट म्हणतात. भट्टीतील किरणोत्सारी गंज तसेच किरणोत्सारी पाणी नजिकच्या नदी, तळे वा सागरात वरचेवर सोडली जातात, त्यास क्रुड म्हणतात. वातावरण व जमिन तसेच जलसाठे किरणोत्साराने प्रदुषीत होत राहतात. पृथ्वीवर पूर्वी कधीही अस्तित्वात नसलेली शेकडो भयानक स्वरूपाची किरणोत्सारी अणुकेंद्रके व द्रव्ये भट्टीत निर्माण होतात व पृथ्वीच्या पर्यावरणात शिरतात यांची किरणोत्साराची प्रक्रिया काही तासांपासून ते शेकडो, हजारो, लाखो किंवा कोट्यावधी वर्षे चालू राहते. मानवासह सर्व सजीवांना हा अनंत काळासाठी असणारा धोका, अणुभट्टीच्या चाळीस ते साठ वर्षाच्या वीजनिर्मिताच्या अत्यल्प काळात निर्माण होतो.

किरणोत्सार हा जीवनाचा मुळ घटक असलेल्या पेशींवर आघात करतो. कॅन्सरचे विविध प्रकार, जन्मजात व्यंगे, इंद्रिये निकामी होणे, मतिमंदत्व, अर्भके बालकांमधील पुढील असंख्य पिढ्यांमधील दोष व व्यंग, मासिक पाळीविषयी समस्या, वंध्यत्व, अशक्तपणा अशा अनेक व्याधी होतात हे निर्विवाद सिध्द झालेले आहे. याशिवाय होणा-या असंख्य व्याधींबाबत अजुनही वैद्यक शास्त्रास पुरेशी कल्पना आलेली नाही.

सुप्रसिध्द अणुवैद्यक तज्ञ डॉ. हेलन कॉल्डीकॉट आपल्या अणुचे खुळ या ग्रंथात म्हणतात, एक डॉक्टर म्हणून मला खात्रीने सांगावे लागते की अणुतंत्रज्ञानात पृथ्वीवरील जीवनाचे उच्चाटन करण्याची धमकी सामावली आहे. जर सध्याचाच कल चाली राहिला तर आपण श्वास घेतो ती हवा, खातो ते अन्न आणि पितो ते पाणी लवकरच एवढ्या प्रमाणात किरणोत्सारी प्रदुषकांनी प्रदुषित होईल की त्यामुळे मानवजातीने कधीही न अनुभवलेला आरोग्याचा धोका निर्माण होईल.

महत्वाचे म्हणजे कर्मचारी आणि कामगारांना त्यांच्या शरिरात किती किरणोत्सार गेला आहे याचा अहवाल दिला जात नाही. कॅन्सरसारख्या आजारात प्रत्यक्ष प्रगट होण्याचा काळ दिर्घ असल्याने अणुउद्योग त्याची जबाबदारी टाळतो.

गळती झाल्यास होणारी किरणोत्सार हा नैसर्गिक किरणोत्सापेक्षा कमी असल्याचे ठोकून दिले जाते. मात्र डॉ. कॉल्डीकॉट व इतर वैज्ञक तज्ञ व शास्त्रज्ञांनी हे स्पष्ट केले आहे की, कोणताही मानवनिर्मित किरणोत्सार हा घातकच ठरतो. कारण ती नैसर्गिक किरणोत्सारात होणारी भर असते.

अनेकदा अणुउद्योगातील कामगार कर्मचा-यांना सांगितले जाते की, तुमच्या शरिरात गेलेल्या किरणोत्साराची मात्रा अत्यल्प आहे. परंतु अशी अत्यल्प मात्रा सातत्याने जात असल्याने त्याचा एकत्रीत होणारा परिणाम हा मोठ्या मात्रेएवढा असतो. शिवाय किरणोत्साराची कोणतीही किमान सुरक्षा मात्रा नसते. परंतु अज्ञानामुळे काम करणारी माणसे आपण सुरक्षित आहोत अशी भ्रामक कल्पना बाळगतात. जेव्हा कर्करोग किंवा इतर घातक व्याधी लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अत्यंत तीव्र किरणोत्साराच्या जागी मुद्दामच हंगामी कामगार-कर्मचा-यांना नेमले जाते. त्यांना कामावरून काढले जाते. भावी आयुष्यात होणा-या प्राणघातक-दुर्धर व्याधींबाबतची जबाबदारी अर्थातच अणुउद्योग झटकून टाकतो.

किरणोत्सारी अणुकेंद्रकांमुळे फळे, मासे, पिके, दुध, मांस, जमीन, जलस्त्रोत इत्यादी प्रदुषित होतात. अशा अन्नाच्या सेवनामुळे मानवी शरीर प्रदुषित होते. म्हणूनच अणुभट्ट्यांच्या परिसरातील वातावरणात व जलस्त्रोतांत सोडले जाणारे किरणोत्सारी प्रदुषण स्थानिक तसेच विस्तृत परिसरातील अन्नस्त्रोतांना प्रदुषित करते. यामुळेच तेथील फळे, मासे, पिके, दुध, मांस इ. निर्यातदेखील शक्य होत नाही. कोकणात आंबे, काजू व इतर फळे, पिके, मांस, मासे यावर याचा विपरीत परिणाम होणार आहे. येथे अणुप्रकल्प आल्यास परदेशांतील जागृत झालेला ग्राहक येथील उत्पादनांस नकार देणार आहे.

चेर्नोबिल, थ्रीमाइल्स आयलंड, चेल्याबिन्स्क, विंडस्केल, हॅनफोर्ड स्वरुपाची भावी दुर्घटना

चेर्नोबिल अणुभट्टीचा स्फोट २६ एप्रिल १९८६ रोजी झाला. या दुर्घटनेत निर्माण झालेल्या किरणोत्साराचा वर्षाव युरोपातील २० देशांत प्रामुख्याने झाला. युनोच्या अहवालाप्रमाणे हा वर्षाव हजारो किलोमीटर अंतर कापून अटलांटीक महासागर ओलांडून कॅनडा या देशात व पुढे प्रशांत महासागराच्या पलिकडे पार जपानपर्यंत पोचला. दुर्घटनेपासून काही वर्षात लाखो माणसे किरणोत्साचे बळी गेली. या दुर्घटनेच्या वीसाव्या स्मृतीदिनाच्या प्रसंगी २००६ सालातील भाषणात युनोचे सरचिटणीस कोफी अन्नान यांनी म्हटले की, आजही सुमारे सत्तर लाख माणसे किरणोत्साराने बाधित आहेत. त्यापैकी तीस लाख बालके आहेत आणि अशी शक्यता आहे की, ती बालके प्रोढावस्था गाठण्याआधीच मृत्यूमुखी पडतील. चेर्नोबिल होऊन खुप काळ लोटला. आता तेच तेच काय सांगता असे म्हणणा-यांना इतर आजार आणि किरणोत्साराचे आजार व इतर अपघात आणि अणुभट्टीचा अपघात यातील फरक समजलेला नाही. किरणोत्सार पुढील अगणित पिढ्यांमध्ये अस्तित्व दाखवत राहतो. कारण तो पुनरुत्पादनाच्या पेशी व जनुक गुणसुत्रांवर आघात करतो, बदल घडवतो.

चेर्नोबिल अणुभट्टीपासुन ३० किमी त्रिज्येच्या वर्तुळातील माणसांना कायमचे इतरत्र हलविले गेलेले आहे. पिप्रियाट हे चेर्नोबिल येथील कर्मचा-यांच्या निवासाचे शहर याच क्षेत्रात येते. हे ५०००० लोकवस्तीचे शहर आता कायमचे निर्मनुष्य झाले आहे. मोटार आणि विमान अपघात होत नाहीत काय? असे म्हणणा-या अज्ञानी अणुसमर्थकांनी अणुअपघात आणि इतर अपघातातील फरक लक्षात घ्यावा. अशीच परिस्थिती रशियातील किश्तिम या शहराजवळच्या भूभागात आहे. चेल्याबिंन्स्क येथील दुर्घटनेनंतर येथील शेकडो किमीचा प्रदेश एखाद्या जीवन नसलेल्या परग्रहाप्रमाणे भयाण, वैराण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जैतापूरचा प्रकल्प मुंबईसह महाराष्ट्र भारतावरील संकट ठरणार आहे.

पृथ्वावरील जीवनाची निर्मिती आणि त्यातील बहुविविधता हा खरा विकास होता. ती खरी प्रगती होती. हायड्रोजन या प्रथम क्रमांकाच्या मुलद्रव्यापासून पुढे ९२ मुलद्रव्यांची निर्मिती, त्याला मिळालेली चैतन्याची जोड व त्यातून अवतरलेले सजीव असा हा जीवन फुलवणारा प्रवास होता. मात्र विज्ञानाच्या अपु-या आकलनाने आणि तंत्रज्ञानाला विज्ञान मानण्याच्या चुकीमुळे पुन्हा उलट प्रवास सुरु झाला. जीवन संपुष्टात आणणा-या भंजनाकडे आणि किरणोत्सार्गाकडे होणारा प्रवास ही अधोगती व विनाश आहे. निसर्गाने अणु जोडले होते मानवाने उन्मादात, अज्ञानापोटी ते तोडले. पदार्थाच्या, द्रव्याच्या सर्वात छोट्या कणाला म्हणजेच अणुला तोडण्याच्या मानवाच्या प्रमादामुळे निर्माण झालेल्या किरणोत्साराने सजीवांच्या घडणीचा, बैठकीचा मुलभूत आधार असलेल्या पेशीचे, त्याचा भावी आराखडा असेलेल्या जनूकाचे भंजन केले. भंजनाच्या अनियंत्रीत शक्तीद्वारे प्राप्त झालेल्या अणुबॉंम्बच्या संहारक उपलब्धीमुळे माणूस बेहोश झाला. पण या नादात त्याने किरणोत्साराला म्हणजेच पर्यायाने पेशींच्या अनियंत्रीत भंजनाला व वाढीला, एका संहारक प्रक्रियेला, कर्करोगाला व इतर व्याधींना मोकाट सोडले. अणुऊर्जेच्या राक्षसाला पुन्हा बाटलीत बंद केल्यानेच जीवन वाचवता येईल.

अनंत पसरलेल्या पृथ्वीवरील जीवन अतुलनीय आहे. त्याच्यासमोर चलन, पैसा किंवा तंत्रज्ञान या क्षुद्र गोष्टी आहेत. हे जीवन जपण्याची मोठी जबाबदारी मेंदूचा विकास झालेल्या मानवावर आहे. कारण निसर्गानेच दिलेल्या मेंदूच्या क्षमतेचा गैरवापर तो करत आहे.

चेर्नोबिलसारखी प्रचंड किरणोत्साराची दुर्घटना, एखादा दहशतवादी हल्ला किंवा गुन्हेगारी मानसिकता असलेल्या गटाच्या अथवा देशाच्या हाती प्ल्युटोनियम पडणे अशा शक्यतांची टांगती तलवार अणुकार्यक्रमाच्या प्रसारामुळे मानवजातीच्या डोक्यावर राहणार आहे. अणुभट्ट्यांमधून अणुबॉंम्ब निर्मितीसाठी आवश्यक अशा प्लुटोनियमची मोठी निर्मिती होत असते. एका एक हजार मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्टीला वर्षाला तीस ते पन्नास अणुबाँम्बसाठी पुरेसे ठरेल एवढे प्लुटोनियम (सुमारे ३०० ते ५०० किलो) तयार होते. अण्वस्त्रप्रसाराला आळा घालणे त्यामुळे अशक्य बनते. आज पृथ्वीवरील जीवनाला शेकडो वेळा नष्ट करू शकतील इतके अण्वस्त्राचे साठे करून ठेवले आहेत. वीजनिर्मितीच्या नावाने साळसुदपणे चालणा-या अणुभट्टयांचे हे छुपे भयावह रुप आहे. अनेक देशांना त्याचेच आकर्षण आहे.

क्रमश:

Monday, May 9, 2011

जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रम (भाग ४)


अणुवीजेचा वाटा नगण्य

कोळसा, तेल व वायु या ऊर्जास्त्रोतांचा इतर कारणांसाठी इंधन म्हणून सरळ वापर करता येतो. उदा. वाहतुक, अन्न शिजवणे, जळण-सरपण इ. तसे अणुबाबत करता येत नाही. या स्त्रोतांचा वीज निर्माण करण्यासाठी झालेल्या वापरापेक्षा इतर कारणांसाठी, उपयोगासाठी झालेला वापर खुप जास्त असतो. वीज उत्पादन हा एकूण ऊर्जा वापरापैकी एक छोटा भाग आहे. ऊर्जेच्या वापराचा छोटा भाग असलेल्या वीज उत्पादनातही अणुपासून निर्माण होणा-या वीजेचा वाटा अल्प आहे. म्हणजे एकूण वीज वापरात अणूचा वाटा नगण्य आहे. गेल्या साठ वर्षात त्याच्या मर्यादांमुळे अणू मोठी कामगिरी पार पाडू शकला नाही. अणूच्या अत्यंत धोकादायक स्वरूपामुळे हे होते. ते नकळत माणसाच्या हिताचेच आहे. परंतु तो मोठी भुमिका पार पाडत असल्याचा आव आणला जातो आणि त्यावर पैशाची अक्षम्य उधळपट्टी करून मानवासह सृष्टीला कार्बन ऊत्सर्जन व किरणोत्सार असा दुहेरी धोका निर्माण केला जातो.

अणुऊर्जा हि वीज उत्पादनाच्या दृष्टीने अनुत्पादक

वरील शास्त्रज्ञांच्या तसेच ऑक्सफर्ड रिसर्च ग्रुपसारख्या इतरही अभ्यासात आढळले आहे की, अणूऊर्जेद्वारा वीज निर्माण करताना खर्च होणारी वीज ही निर्माण होणा-या वीजेएवढीच किंवा त्याहून जास्त असते. अर्थात अणूऊर्जा हि वीजनिर्मितीच्या दृष्टीने अनुत्पादक आहे.

किरणोत्साराचे आरोग्यावरील व इतर जैविक दुष्परिणाम

डॉ. मॅनफुसो यांनी हॅनफोर्ड येथील पुर्नप्रक्रिया उद्योगातील कामगारांच्या मृत्यूचा किरणोत्साराशी असलेला संबंध सिध्द करणारा अभ्यास केला. हा अमेरिकन संरक्षण खात्याचा अभ्यास आहे.

डॉ. गॉफमन आणि डॉ. टँपलीन यांनी अमेरिकन सरकारतर्फे केलेला अण्वस्त्रचाचणीच्या किरणोत्सारामुळे अर्भकांचे मृत्यू होत असल्याचे सिध्द करणारा अहवाल.

डॉ. अलिस स्टुअर्ट यांचा गर्भवती स्त्रीयांवर व अर्भकांवर होणारा किरणोत्साराचा व क्ष किरणांचा दुष्परिणाम दाखविणारा अभ्यास.

डॉ. एडवर्ड गार्डन यांचा कॅनडाच्या सरकारतर्फे केला गेलेला मानवी आरोग्यावरील व सजीवांवरील किरणोत्साराच्या घातक दुष्परिणामांबाबतचा अहवाल.

डॉ. सुरेंद्र गाडेकर यांचा रावतभाटा व जादुगोडा येथील किरणोत्सार व आजारांच्या संदर्भाचा अभ्यास. कल्पक्कम अणुकेंद्राच्या किरणोत्सारामुळे होणा-या कॅन्सरबाबतचा डॉ. पुगाझेंथी व सहका-यांचा अभ्यास.

असे अनेक अभ्यास उपलब्ध आहेत. ते निर्विवादपणे अणूऊर्जेची घातकता सिध्द करतात.
पुढील ग्रथांनी अणूऊर्जेचे भीषण स्वरूप स्पष्ट केले आहे.

डॉ. हेलन कॉल्डीकॉट यांचे न्यूक्लिअर मॅडनेस आणि न्यूक्लिअर पावर इज नॉट द आन्सर व इतर ग्रंथ

डॉ. रोझेली बर्टेल यांचे इमिजिएट डेंजर व इतर ग्रंथ

डॉ. अर्जून मखिजानी यांचे कार्बन फ्री एण्ड न्यूक्लिअर फ्री

लर्डॉ. मखिजानी व स्कॉट सालेस्का यांचे हाय लेव्हल डॉलर्स- लो लेव्हल सेन्स

पीटर प्रिंगल आणि जेम्स स्पीगलमन या पत्रकारांचे द न्यूक्लिअर बॅरान्स

जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे डॉ. धीरेंद्र शर्मा यांचे इंडियाज न्यूक्लिअर इस्टेट

केन्झाबुरो ओए यांचा १९९४ नोबेल पुरस्कारप्राप्त ग्रंथ द हिरोशिमा नोटस

ग्रीनपीस सारख्या संघटनांनी अणूऊर्जेच्या प्रत्येक अंगावर अभ्यास अहवाल बनविले आहेत.

२००९ सालात ग्रीसमध्ये लेसव्हॉस येथे नामवंत किरणोत्सार तज्ञांची परिषद झाली. तेथे जनुके, गुणसुत्र व पेशींवरील होणा-या दुष्परिणामांची नवी माहिती पाहता आतापर्यंतची सर्व मानके कालबाह्य ठरली. लेसव्हॉसचा जाहिरनामा प्रदर्शित झाला. महत्वाचे म्हणजे किरणोत्साराची कोणतीही किमान सुरक्षापातळी नाही. हे पुन्हा अधोरेखित झाले.

तारापुर अणूऊर्जा प्रकल्पाचे गावांवरील दुष्परिणाम. घिवली, उच्छेली, दांडी व इतर गावे आरोग्याबाबत निरिक्षण

- कॅन्सरचे मोठे प्रमाण

- सकाळी उठल्यावर ग्लानी, ताजे वाटत नाही.

- अंग दुखत असते, थकवा सतत वाटतो.

- मासिक पाळी रक्तस्त्राव १०-१५ दिवस सतत होत राहतो.

- वंध्यत्वाचे मोठे प्रमाण

- मृत बालकांच्या जन्माचे मोठे प्रमाण

- मेंदूवर दुष्परिणाम ५५-६० वर्षाच्या वयात दिसतो.

- मानसिक संतुलन बिघडले.

- मतिमंदत्व

- लहान मुलांत हात, पाय, सांधेदुखीचे प्रमाण मोठे

- मूत्रपिंड व इतर इंद्रिये निकामी होणे

- मासे तपासणीसाठी नेले जातात परंतु त्याचे निष्कर्ष कधीही सांगितले जात नाहीत.

- किरणोत्साशी संबंधित कामासाठी अनेक तास राबवले जाते.

- सागरातील मासळी संपली आहे. थोडक्यात येथील ग्रामस्थांचे मत आहे की, आम्ही उध्वस्त झालो आहोत. हे आजार पालघर, डहाणू परिसर व ठाणे जिल्ह्यावर पडलेले किरणोत्साराचे सावट स्पष्ट करतात. याशिवाय या प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या उपजिवीकेच्या, पुनर्वसनाच्या, नागरी सेवा सुविधांच्या, गावांच्या बकाल होण्याच्या इ. समस्या आहेत.

क्रमश:

Sunday, May 8, 2011

जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रम (भाग ३)


अणु आस्थापनांची गोबेल्सनिती

दि. १३ जानेवारी २०१० च्या वृत्ताप्रमाणे मुंबईतील गिरगांव येथे सुशिक्षितांच्या उपस्थितीत मॅजेस्टिक गप्पांच्या कार्यक्रमात काकोडकरांनी सांगितले की, थेरिअमपासून ऊर्जानिर्मिती करण्यास भारत युनिक आहे. यातून असा भास होतो की, जणूकाही खरच भारत अशी वीजनिर्मिती करत आहे. परंतु वस्तुस्थिती अशी नाही. उलट युरोप, अमेरिकेने प्रचंड खर्च व अत्यंत धोकादायक दुर्घटनांमुळे अशा प्रयत्नांचा नाद सोडला आहे.

वृत्तपत्रांत दापोली कृषी विद्यापिठाने जैतापूर प्रकल्पास हिरवा कंदिल दिला असे वृत्त प्रसिध्द झाले होते. याबाबत माडबनच्या डॉ. वाघधरे यांनी माहिती अधिकाराखाली विचारणा केली. तेव्हा विद्यापिठाने स्पष्ट केली की त्यांच्याकडे फक्त वनस्पती आणि प्राणी यांच्यासंदर्भातील केवळ माहिती देण्याचे काम दिले गेले होते. त्यांना पाठिंबा दिलेला नाही अथवा विरोधही केलेला नाही. हिरवा कंदिल देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

अणुशक्ती महामंडळाला (NPCIL) आपण देशातील कायद्यांपेक्षा, घटनेपेक्षा मोठे आहोत असे वाटते. जनसुनावणी झाल्यानंतर पर्यावरण व वन मंत्रालयाचा निर्णय येणे अपेक्षित असताना, त्यापूर्वीच मंडळाचे अधिकारी श्री. जैन यांनी जाहिर केले की ते १ जुलै रोजी प्रकल्पाचे काम सुरु करणार. यातून घटनाविरोधी व लोकशाहीविरोधी वृत्ती स्पष्ट होते.

पेंडसे-कद्रेकर समिती अहवाल – २००६

या सरकारच्या अहवालाने स्थानिक जलप्रवाहावर छोटी वीज केंद्रे निर्माण करून कोकणात चार हजार मेगावॅट वीज निर्माण करता येईल हे दाखविले आहे. कोकणाची (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) स्वत:ची वीजेची गरज फक्त सुमारे १७० मेगावॅट एवढीच आहे हे लक्षात घेतले पाहिजे. सरकारने कोकणातून ४२००० मेगावॅट वीजनिर्माण करण्याचे ठरविले आहे. (औष्णिक १२ प्रकल्प ३२००० मेगावॅट, आण्विक १०००० मेगावॅट) देशातील एकूण उत्पादनाच्या सुमारे ३० टक्के वीजनिर्मितीमुळे कोकण अक्षरश: भाजुन निघणार आहे. महाराष्ट्रातील वीजेची तुट फक्त ४००० मेगावॅट आहे. तीदेखील दुर करण्याचे इतर मार्ग आहेत.

अणुऊर्जा ग्लोबल वार्मिंगच्या समस्येचे उत्तर नाही

वीज निर्मितीच्यी दृष्टीने अनुत्पादक – वीजनिर्मितीसाठी वापरलेल्या वीजपेक्षा उत्पादित वीज कमी. खनीज इंधनाएवढे वा त्यापेक्षा जास्त कार्बन उत्सर्जन, शिवाय किरणोत्सार. युरोपियन संसदेने सन २००४ मध्ये अणुऊर्जेद्वारे वीज निर्माण करताना होणा-या कार्बन डाय ऑक्साइडच्या उत्सर्जनाचा अभ्यास केला. डॉ. विलेम स्टॉर्म आणि डॉ. फिलीप स्मिथ या शास्त्रज्ञांनी केलेल्या या उत्कृष्ट अभ्यासात आढळले कि, जगात सर्वत्र साधारणपणे आढळणारे युरेनियम खनीज वापरल्यास फक्त खाणीतून युरेनियम काढणे, युरेनियम दळणे, युरेनियम समृध्द करणे एवढ्याच प्रक्रियांत होणारे कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन हे कोळसा, तेल अथवा वायु वापरून केलेल्या वीजनिर्मितीत होणा-या कार्बन डाय ऑक्साईडच्या ऊत्सर्जनी एवढे असते.

ज्वलनशील कोळसा, तेल व वायु मिळवणे हि तुलनेने अत्यंत सोपी गोष्ट ठरते. परंतु भंजनशील अणूच्या रूपातील युरेनीयम मिळवणे ही अत्यंत कठीण व धोकादायक प्रक्रिया आहे. ही गोष्ट अणूचे समर्थक लपवतात. वरील अभ्यासात दिसले की, टाकाऊ इंधनावरील पुर्नप्रक्रिया, अणुभट्टीची बांधणी, ती मोडीत काढणे आणि पुढील लाखो वर्षासाठी किरणोत्सारी द्रव्ये व इतर पदार्थांचे मानव, इतर सृष्टी पर्यावरणाच्या संपर्कात येऊ न देता जतन करणे यासाठी करावे लागणारे बांधकाम आणि या सर्व काळात होणारी वाहतुक यासाठी वापरली जाणारी कोळसा, तेल व वायु ही इंधने प्रचंड प्रमाणात कार्बनचे उत्सर्जन करतात. मिथेन, नायट्रोजनची ऑक्साईड आणि कार्बन डाय ऑक्साईच्या सुमारे वीस हजार पटीने जास्त प्रमाणात पृथ्वीला तापवण्यास कारणीभूत ठरणारी क्लोरोफ्लुरोकार्बन्स ही द्रव्ये जमेस धरली तर अणुऊर्जा कोळसा, वायु वा तेलापेक्षा फार मोठ्या प्रमाणात हरितगृह परिणाम करणा-या म्हणजे तापमानवाढीस व वातावरणातील बदलास कारण ठरणा-या वायुंचे उत्सर्जन करते. यासाठी अणु इंधन चक्र किंवा युरेनीयम इंधन चक्र ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. परंतु अणुचे समर्थक ही जगातील सर्वांना मान्य असलेली संकल्पनाच नाकारतात आणि भंजनाच्या क्रियेत कार्बन उत्सर्जन होत नाही अशी बालीश परंतु लबाड भूमिका घेतात. विंडस्केल, थ्री नाईल्स आयलंड, चेर्नोबिल, चेल्याबिन्स्क, हॅनफोर्ड अशा अनेक ठिकाणच्या दुर्घटनेनंतर अणुऊर्जेला युरोप-अमेरिकेतील जनता नाकारत आहे. अशावेळी या दशकांत जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर अणूऊर्जेला पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र हा फुगा लवकरच फुटला आणि युरोप, अमेरिकेतील जनमत जागृत झाले. मात्र भारतात हाच असत्य प्रचार जोमाने सुरू आहे. ही दुर्दैवाची बाब आहे.

क्रमश:

Saturday, May 7, 2011

जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रम (भाग २)


सागरी जीवनावरील दुष्परिणाम

NPCIL नेच येथे १००० मेगावॅट क्षमतेची अणुभट्टी केल्यास त्याचा सागरी जीवनावर काय परिणाम होईल याचा अभ्यास १९८९-९० सालात भारतीय सागर विज्ञान संस्थेकडून करून घेतला. या अहवालात असे नमूद केले आहे की, येथे उत्कृष्ट आणि मुळ रूपात असलेले सागरी जीवन आहे. प्रकल्पाने सागरातील पाणी घेऊन ते गरम करून परत सागरात सोडल्यास या सागरी जीवनाचा पूर्ण नाश होईल. तापमानातील थोडाही फरक मस्त्यसृष्टी सहन करू शकत नाही.
जैतापूर प्रकल्पात रोज ५२०० कोटी लीटर पाणी सागरातून घेऊन भट्टी थंड करण्यासाठी वापरून सुमारे १२ अंश सेल्सिअस एवढ्या वाढलेल्या तापमानाने परत सागरात सोडले जाईल. या पार्श्वभूमीवर प्रकल्प रद्द करणे आवश्यक असताना तसे न करता उलट पूर्वीपेक्षा दहापट क्षमतेच्या सहा भट्टयांचा (१६५० मेगावॅट प्रत्येकी) प्रकल्प हाती घेतला आहे.

वरील अहवालाचा उल्लेखही न करता CWPS (Central Water and Power Research Station) या संस्थेकडून अलिकडे दुसरा अहवाल बनवून घेतला आहे. मुळात ही संस्था अभियांत्रिकी स्वरुपाची आहे. ही संस्था सागराचा प्रत्यक्ष अभ्यास करत नाही. ती पुण्याला प्रतिकृतीवर (Model) अभ्यास करते. हीच मुळात अवैज्ञानिक गोष्ट आहे. या संस्थेने इतरत्र केलेले अहवाल चुकीचे व हानीकारक असल्याचे सिध्द झालेले आहे. या संस्थेने जैतापूर प्रकल्पाबाबत केलेल्या अहवालात राजापूर आणि विजयदुर्ग या दोन महत्वाच्या खाड्यांची दखल घेतलेली नाही. हा अहवाल आणि प्रकल्प दोन्ही अयोग्य आहेत.
मुंबई नॅचरल हिस्टरी सोसायटीने गेल्या काही महिन्यात कोकणच्या किना-यांचा व सागराचा जैवविविधता अभ्यास केला. त्यात या प्रकल्पक्षेत्राजवळील सागरात उत्कृष्ट जैवविविधता असल्याचे नमूद केलेले आहे. याच संस्थेने माडबन येथील जैवविविधतेचा देखील अभ्यास केला. त्यात जमीनीवर तसेच जमीन व सागराचा दुवा असलेल्या क्षेत्रात तिवरांमध्ये असाधारण जैविक विविधता आढळली.

इतरही शास्त्रज्ञांनी माडबन परिसर व तेथील सड्यावरील गवत व इतर वनस्पती व प्राणीजीवनाच्या समृध्दीचा अभ्यास केला. नॅशनल जिओग्राफिक ने पश्चिम घाटातील जैविक विविधतेची माहिती दिलेली आहे. सागरी व इतर प्राणी जीवनावरील जगभरातील अभ्यासानी किरणोत्साराने होणारे दुष्परिणाम नोंदले आहेत.

सागर हि प्रत्येक कण गतीमान असलेली परिसंस्था आहे. त्यामुळे येथील किरणोत्साराचा प्रसार महाराष्ट्राच्या विस्तृत किनारपट्ट्यांवर व आतील सागरात होणार आहे. प्रदुषित मासळी अन्नात येणार आहे. आज औद्यागिकरणामुळे मुंबईतील नद्या, खाड्या व सागर मृत झालेले आहे. कोकणच मुंबईसह इतर वाढलेल्या लोकवस्तीच्या भागांना मासळी पुरवत आहे. यापुढे कोकणचाही सागर मृत झाल्याने प्रथीनांचा मोठा पुरवठा करणारा मासळी हा चविष्ट अन्नघटक दुर्मिळ व अतिशय महागडा होणार आहे.

या अभ्यासांना कोकणच्या प्रकल्पांचा निषेध केला आहे. जैतापूर अणुऊर्जा केंद्राचे दुष्परिणाम तर किरणोत्सारामुळे पुढील अनंत काळासाठी जीवजातींना भोगावे लागणार आहे.

अणुऊर्जेबाबतचे खोटे दावे.

सत्य : अणुऊर्जेची वीजनिर्मिती नगण्य, फक्त २.७ टक्के. अणुवीज सर्वात महागडी

गेल्या दोन वर्षातील देशातील वीज उत्पन्नाबाबतची सत्यस्थिती

वर्ष
एकूण वीज उत्पादन
मे. वॅ.
नूतनीकरण स्त्रोत
मे. वॅ.
अणूऊर्जा
मे. वॅ.
२००९
१४७०००
१३२४२
४१२०
२०१०
१६७०७७
१६७८६
४५६०

ही आकडेवारी बोलकी आहे. अणुऊर्जेवर नगण्य वीज उत्पादनासाठी प्रचंड खर्च केला गेला. त्यातून कार्बन व किरणोत्साराचे भयानक प्रदुषण निर्माण झाले. मात्र सौर, पवन, जैविक, लघुजलविद्युत, घनकचरा इ. नूतनीकरणक्षम पर्यायी ऊर्जास्त्रोतांमुळे सुमारे चारपट जास्त वीज निर्माण झाली तीदेखील चारपट खर्च कमी करून. निवड स्पष्ट आहे. देशाने नूतनीकरनक्षम, प्रदुषणरहित, धोका नसलेल्या ऊर्जास्त्रोतांकडे वळले पाहिजे.

अणुऊर्जेला गेली साठ वर्षे लाडावले गेले आहे. उलट फक्त गेल्या वीस वर्षात आणलेल्या प्रदुषणरहित नूतनीकरणक्षम पर्यायी ऊर्जास्त्रोतांनी त्याची आर्थिक आबाळ होत असतानाही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

मॅसाच्यूसेट तंत्रज्ञान संस्थेचा अहवाल

स्त्रोत
कोळसा
वायु
अणुवीज देशी
अणुवीज आयात
वीजदर प्रती एक रू
२.३७
२.४४
३.६०
५.००
प्रतीमेगावॅट भांडवली खर्च रू. कोटीमध्ये
३.७६
३.००
७.७४
११.२३

वरील तक्त्यावरून अणूवीज महाग आहे हे स्पष्ट होत आहे. वरील आकडेवारीत छुपे खर्च आणि अनुदाने धरलेली नाहीत. ती धरली तर अणुवीज याहुन खुप महाग आहे.

अणुऊर्जा हा पांढरा हत्ती आहे. हे लक्षात येत नाही कारण या वीजेची किंमत ख-या अर्थाने नागरीक बिलातून नव्हे तर करातून भरतो. अणूउद्योग देशाचा प्रचंड पैसा गिळंकृत करतो. जनतेचे अज्ञान आणि बधीरपणा हे अणूउद्योगाचे खरे भांडवल आहे.

उपाय व पर्याय

१. नूतनीकरणक्षम – अकार्बनी किरणोत्साररहित अक्षय ऊर्जास्त्रोत जसे की सौर, पवन, सागरीलाटा, जैविक, भूऔष्णिक इ. वापरणे. फक्त थरच्या वाळवंटातून सौर ऊर्जेद्वारा देशाची सध्याची विजेची गरज भागवता येईल. खंबायतच्या परिसरातील भरतीच्या लाटांच्या वैशिष्ट्यांमध्ये अशीच क्षमता आहे. कोकणातील भुगर्भातील ऊष्णतेद्वारे १०००० मे. वॅ. वीज मिळू शकते.
२. ३९ टक्के ते ५२ टक्के असलेली वीजगळती थांबवणे. ऊर्जा कार्यक्षमता म्हणजे ऊर्जाबचत करणे. वीज कमी वापरणे. वाहनात फुकट जाणारी वीज योग्य उपकरणांद्वारे वाचविणे. वीज वापर होतो त्याच जागी वीज उत्पादन करणे.
३. वीजेची मागणी मुळातच कमी करणे – वीजशिवायची जीवनपध्दती उदा. भास्कर सावे, उंबरगाव, गुजरात यांची निसर्गशेती यात कृत्रीम बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, तण, बुरशीनाशके, वीजपंप, ट्रॅक्टर इ. वापरली जात नाहीत. तरीही अशा शेतीवर उत्कृष्ट विक्रमी उत्पादन मिळते. सेंद्रिय-निसर्ग शेतीवर आधारित स्वयंपर्ण गावांच्या निर्मितीने वीजेच्या वापराचे प्रमुख कारण असलेल्या औद्योगिकरण व शहरीकरणाची गरज उरत नाही. वीजेची नैसर्गिक संसाधनाची उधळपट्टी व नाश करणारी जीवनशैली टाळणे. अशी जीवनशैली ठेवणारी लोकसंख्यावाढ रोखणे.

सध्या आदर्श आणि लवासासाठी वीज तयार होते. ज्यांच्या आधीच ब-याच मालमत्ता आहेत, अशा खाबुगिरी करणा-या वरिष्ठ नोकरशहा, राजकारणी आणि धनदांडग्यांसाठी हे होत आहे. सामान्य माणसाने हे लक्षात घेतले पाहिजे की, तो निमित्त म्हणून वापरला जात आहे. मुंबईतील एका एका मॉल-टॉवर्समध्ये देशातील काही पंचक्रोशींची वा तालुक्यांची वीज जाळली जाते. औष्णिक वीजनिर्मितीसाठी वापरली गेलेली डहाणूची खाडी आणि नाशिकमधील एकलहरासारख्या देशातील ३०० प्रदेशांचे फक्त १-२ दशकात वाळवंटात रूपांतर होत आहे. तेथील लोकांची गरज अत्यंत कमी असूनही त्यांना मात्र ही वीज दिली जात नाही.

पर्यायी ऊर्जास्त्रोत

सूर्यप्रकाश, वारा, पाऊस, भरत्या, वाहते पाणी, भूगर्भातील उष्णता हे ऊर्जीप्रकार निसर्गाकडून सतत अत्यंत कमी वेळात भरून काढले जातात. यांना नवे, नुतनीकरणक्षम किंवा अपारंपारिक ऊर्जास्त्रोत म्हटले जाते. प्रचंड धरणांनी उपलब्ध होणा-या ऊर्जेची मात्र पारंपारिक ऊर्जेत गणना होते.

जरी भविष्यातील ऊर्जेच्या गरजेबाबतचे सरकारचे अंदाज मानले, तरी महागड्या, प्रदुषणकारी, धोकादायक आणि मृत्यूदुत असलेल्या अणूशक्तीची वाट चोखाळण्याची कोणतीही गरज नाही. ऊर्जेची पूर्ण गरज इतर ऊर्जाप्रकारांकडून भागवली जाऊ शकते, ती देखील पर्यावरणाचा मोठी नाश टाळून. आजच सर्व अणूऊर्जा प्रकल्प बंद केले तरी नूतनीकरणक्षम अकार्बनी ऊर्जास्त्रोत भविष्यातील आपल्या सर्व गरजा भागविण्यास चांगलेच समर्थ आहेत. हे केवळ भारताबाबत, नाही तर जगाबाबतही खरे आहे. उदा. अमेरिकेच्या विजेच्या गरजेच्या तिप्पट वीजपुरवठा करण्यासाठी फक्त रॉकी पर्वत आणि मिसिसीपी नदी यामधील वा-याचा प्रवाह पुरेसा आहे. जगातील ८००० स्थानांवरील वा-यांच्या अभ्यासात आढळले की, जगातील पवन ऊर्जेची क्षमता ७२ टेरावॅट म्हणजे २००० सालात पूर्ण जगाने वापरलेल्या वीजेच्या ४० पट एवढी आहे.

क्रमश:

Sunday, May 1, 2011

जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रम (भाग १)


जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रमही एड. गिरीश वि राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तिका क्रमश: आज पासून माझ्या ब्लॉगवर अपडेट करत आहे. यामागील उद्देश केवळ हाच आहे की, कोकणात निसर्गाने दिलेल्या वरदानाकडे सरकार दुर्लक्ष करून अणूऊर्जेसारखा घातक प्रकल्प केवळ अमेरिकेला खुष करण्यासाठी स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता राबवण्याचा प्रयत्न करतेय. एक कोकणी माणूस म्हणून आणि आपल्या कोकणी बांधवांची ओरड का आहे हे या पुस्तिकेत लिहिलेले आहे व ते आपणा सर्वांपर्यंत पोहचावे.

माडबन व इतर गावांच्या शेती व इतर उपजीविका

माडबन व इतर गावातील शेतकरी, प्रकल्पासाठी ताब्यात घेत असलेल्या सुपिक जमिनीवर गाईगुरांसह उत्कृष्ट शेती करत आले. भात व इतर पिके तसेच आंबा, काजू, नारळ, कोकम, मसाल्याची पिके इ. घेतली जातात. परंतु तरीही ही जमीन वैराण आहे असे दाखविले गेले.
माडबनचा सडा हा उत्कृष्ट जैवविविधता असलेल्या गवताळ परिसंस्थेचा समृध्द नमुना आहे. हजारो वैशिष्ट्यपूर्ण जीवजातींचे जीवन पावसाळ्यात बहरते. गवताळ जमीन गुरांसाठी उत्कृष्ट चारा पुरवते. स्थानिकांकडून बाऊल म्हणून ओळखल्या जाणा-या खोलगट भागात विशिष्ट भातजातीचे भरीव पिक घेतले जाते. चार-पाच चौ. किमी क्षेत्र असलेल्या सड्याची (पठाराची) उंची सुमारे ८० फुट आहे. हा सडा प्रकल्पासाठी तोडण्यात येणार आहे. ५५ फूट भाग कापून सड्याची उंची २५ फूटापर्यंत कमी करण्यात आलेली आहे. असाधारण परिसंस्थेचा हा पूर्ण विनाश असेल.
नाटे व इतर गावांजवळील सागरावर किरणोत्सर्ग आणि गरम पाण्यामुळे अंत्यंत प्रतिकुल परिणाम होणार आहे. परंतु अनेक सागरी गावांवर दुष्परिणाम होणार असूनही त्याबाबत गुप्तता बाळगली गेली आहे.

शेतकरी व मच्छीमारांचा या प्रकल्पास पूर्ण विरोध आहे. सर्व गावांनी, त्यांच्या ग्रामस्थांनी, प्रकल्पाच्या विरोधात ठराव केले आहेत. या सर्वांचा कोणतीही नुकसान भरपाई घेण्यास नकार आहे. त्यांना मुळातच हा प्रकल्प नको आहे. त्यांना आपली हजारो वर्षे चालत आलेली शांत व सुखदायी जीवनपध्दत चालू ठेवायचीय.

या गावांवर प्रकल्प लादणे हे लोकशाही विरोधी आहे. त्यात हा प्रकल्प पूर्णपणे असत्यावर आधारित आहे. त्यासाठी इंग्रजांनी केलेल्या कायद्याचा आधार घेऊन आधी जमिनी ताब्यात घेतल्या गेल्या. प्रकल्प करावा की करू नये याचा निर्णय घेण्यासाठी आवश्यक त्या, पर्यावरण प्रभाव मुल्यांकन सार्वजनिक सुनावणी इ. बंधनकारक कायदेशीर बाबी केवळ देखावा म्हणून नंतर पार पाडण्यात आल्या. काही गावांना अहवाल मिळाला नव्हता.

अक्षय्य तृतियेसारख्या महत्वाच्या मूहुर्तावर दि. १६ मे २००९ रोजी सार्वजनिक सुनावनी घेँण्यात आली. तरीही हजारो ग्रामस्थ हजर राहिले. शेकडोंनी लेखी स्वरुपात वा भाषणे करून विरोध व्यक्त केला. विशेष म्हणजे एकाही ग्रामस्थाने प्रकल्पाचे समर्थन केले नाही. मुल्यांकन करणा-या संस्थांकडे किरणोत्साराच्या मुल्यमापनाची व प्रभाव तपासण्याची क्षमताच नाही. पर्यावरण प्रभाव मुल्यांकनतील असत्य, बनावट माहितीची चिरफाड केली गेली. तरीही पर्यावरण व वनमंत्रालयाने या प्रकल्पाला ना हरकत प्रमाणपत्र दिले ही लाजिरवाणी बाब आहे. तितकीच संतापजनक आहे. जैतापूर प्रकल्पात विस्थापनाचा प्रश्न नाही असे यंत्रणांना दाखवायचे आहे. म्हणून अतिनिषीध्द अशा १.६ किमी त्रिज्येच्या क्षेत्रात गावकरी रहात असूनही तसे काही नाही असे भासविले जात आहे. मात्र त्याचवेळी प्रकल्पातील कर्मचा-यांच्या निवासाच्या इमारती पाच-दहा किमी अंतरावर नियोजित आहेत. ५ किमी त्रिज्येच्या क्षेत्रातील विकासास बंदी असणारे प्रतिबंधीत क्षेत्र (Starile Zone) आणि अपघात घडल्यास कोणत्याही क्षणी घर सोडून जावे लागणारे सुमारे तीस ते पन्नास किमी त्रिज्येच्या वर्तुळातील व्यवस्थापन क्षेत्र, यातील रहिवाश्यांना याबाबत कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. त्यातून प्रकल्पकर्त्यांना स्थानिक जनतेबाबत. त्यांच्या जीविताबाबत असलेली अनास्था दिसते.

या प्रकल्पासाठी वीज वाहनाचे नवे जाळे तयार करावे लागणार आहे. त्यासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात जंगलतोड होणार आणि जनतेचा प्रचंड पैसा खर्च होणार आहे.

या प्रकल्पामुळे कोकणाची नैसर्गिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक ओळखच नष्ट होणार आहे. तारापूरसारख्या उदाहरणातून हे स्पष्ट झाले आहे. विकासाच्या नावे बिनचेह-याच्या गर्दीचे लोंढे वाढत आहेत.

भूकंप प्रवणता आणि जैतापूर (माडबन) अणूऊर्जा प्रकल्प

भूकंप – अलिकडच्या २० वर्षात ९३ धक्के, त्यात ६ पेक्षा जास्त रिश्टर क्षमतेचे धक्के. संबंधित खात्याचे कागदपत्र. रत्नागिरी झोन ३ व ४ मधे. डॉ. एम. के. प्रभू (किल्लारी भूकंपाबाबत सरकारने नेमलेल्या समितीवरील भूकंपतज्ञ) यांचा, हा परिसर अत्यंत भूकंपप्रवण असल्याचा अहवाल. भूकंपाचा केंद्रबिंदू या परिसराखाली सरकला असल्याचे डॉ. प्रभूंचे मत आहे. गेल्या १० वर्षातील धोपेश्वर, देवाचे गोठणे, महांगुळे, शिवणे इत्यादी ठिकाणी झालेले डोंगर खचणे, जमीन फाटणे, तडे जाणे. काही तडे काही किमी लांबीचे आहेत, काही तड्यांची खोली सुमारे ५० फूट तर रूंदी ७० फूट आहे. (शिवणे मध्ये हे तडे सप्टेंबर-ऑक्टोबर २००९) उन्हाळेचा उष्ण पाण्याचा झरा हा सक्रिय भूभ्रंशावर (Active Fault) आहे. हा भूभ्रंश सागराला समांतर, पूर्ण कोकण पट्टीवर आहे. वसई, वज्रेश्वरी, संगमेश्वर, राजापूर ही उष्ण पाण्याची कुंडे याच भूभ्रंशावर आहेत. प्रकल्पाच्या स्थानापासून उन्हाळेचे अंतर सुमारे १७ किमी आहे. तरीही तेथे सक्रिय भूभ्रंश नाही असे NPCIL म्हणते. मुंबई ते रत्नागिरी ही किनारपट्टी विभाग ४ मध्ये येते. हा अतिधोकादायक (High Risk) विभाग आहे. मुंबई बेटाच्या पूर्वकिना-याच्या दक्षिणेकडील लगतची खोली (गेटवे व गोद्यांचा भाग) अलिकडच्या भूतकाळात (शेकडो वर्षापूर्वी) झालेल्या भूकंपांमुळे जमीन खचल्याने निर्माण झालेली आहे. येथील भूभाग ४० फूट खचला. सागरतळाशी तेव्हा गाडल्या गेलेल्या तिवराच्या (Mangrove) जंगलाचे अस्तित्व आहे. (संदर्भ - नॅशनल बुक ट्रस्टचा ग्रंथ: भूकंप लेखक सुप्रसिध्द भूकंपतज्ञ डॉ. हेम्माडी) कोणतेही भूकंपरोधक तंत्रज्ञान वापरून केलेले बांधकाम अशा भूकंपाला तोंड देऊ शकणार नाही. तीन वर्षीपूर्वी जपानमधील काशीवाझाकी येथील सात अणूभट्टया भूकंपाने तडे गेल्याने बंद कराव्या लागल्या. अमेरिकेला लाखो-कोटी रूपये खर्च गेल्या तीस वर्षात करूनही युक्का पर्वतातील किरणोत्सारी कच-याची दफनभूमी तयार करण्याचा प्रयत्न भूकंपाच्या भितीने सोडावा लागला. १९७२ सालात सरकारने डॉ. एम. व्ही. वेंगुर्लेकर समिती नेमली. भूकंपाचे निकष ठरवणा-या या समितीने झोन तीन, चार व पाच मध्ये अणूभट्टया बांधण्यास मनाई केलेली आहे. भूकंपप्रवणता हा अणूभट्टया बांधण्याबाबत प्रथम क्रमांकाचा निकष आहे. वरिल वस्तुस्थिती पाहता जैतापूर (माडबन) प्रकल्प या निकषावर टिकत नाही. तो रद्द करण्यात यावा.

क्रमश