Thursday, September 4, 2014

आम्ही पोलिसांचा विरोध मोडून विसर्जन वाहत्या पाण्यातच केले.

ह्यावर्षी आमच्या इथल्या गणेश घाटावर विसर्जन करू नये अशी विनंती नगरपालिकेने केली होती.त्यासाठी खोटी कारणे  देण्यात आली होती. जसे गणेश घाटावरील पाणी दुषित आहे. (वाहते पाणी दुषित असते हा नवीन शोध लावल्याबद्धल लावणार्यांचे सत्कार करावयास हवे.) खरे तर ह्या घाटावरून जो रस्ता-पूल  जातो त्याचे रुंदीकरण करण्यात आले. त्यात घाटात काही गाळ पडला तो साफ केला गेला नाही.पुलाचे एका बाजूचे काम थोडे बाकी आहे. अशी खरी कारणे देण्याऐवजी खोटी कारणे देण्यात आली होती. मोठ्या मूर्तींसाठी हे योग्यच आहे. पण आमची मूर्ती अगदीच छोटी. आणि  पर्यायी व्यवस्था ह्या घाटापासून १ किमी लांब होती. मग आम्ही का पायपीट करून लांब जायचे तेही वृद्ध वडिलांना घेऊन ? आणि आम्ही हिंदू आहोत.मूर्तींचे नैसर्गिक वाहत्या पाण्यातच विसर्जन करणार तेही जवळच्याच. 



आमचा बाप्पा 
(दरवर्षी ह्याच आकाराची मूर्ती असते. रंगसंगती फक्त बदलते.)

मग आम्ही गणेश घाटावरच गेलो. मी व माझे वडील दोघेच. घाटात उतरत असताना एक पोलिस शिपाई आडवा आलाच.

तो म्हणाला- इथे ह्यावर्षी विसर्जन बंद केले आहे.तुम्ही तिकडे आत जा. तिकडे सोय केली आहे.          

मी (त्याच्या दुप्पट आवाजात) -इथे विसर्जन करू नये अशी "विनंती" केली आहे. विनंतीच आहे. "आदेश" नाहीये. मला हि विनंती मान्य नाही. मी इथेच विसर्जन करत आलोय आणि इथेच करणार. जा कुणाला बोलवायचं त्यांना बोलाव.        

मी तरुण, नसेल ऐकत म्हणून त्याने मोर्चा आमच्या वडिलांकडे वळवला. त्यांनी पण सांगितलं आम्ही इथेच विसर्जन करणार. पोलिस परत माझ्याकडे आला. म्हणाला- आपण इतके दिवस मनापासून पूजा केली बाप्पाची. मी पण मानतो गणपतीला. म्हणून सांगतो इथे खराब पाण्यात विसर्जन करू नका.

मी त्याला म्हणालो- कधी ड्युटी लागली इथे ?

तो- आजच

मी- माहिती नाहीये तर माहिती करून घ्या. आम्ही इथेच राहतो. इथेच दरवर्षी विसर्जन करतो. हे वाहते पाणी आहे. गेले २ तास पाऊस पण मोठा  जोराचा पडलाय. शुद्ध आहे हे पाणी. आणि हे जे नाटक ह्यावर्षी केलंय ते कुणासाठी हे वेगळ सांगायला नको.पुलाचे काम वेळेत पूर्ण केले नाही , काम चालूये त्यासाठी असेल.त्यासाठी  मी का लांब जाऊ ? मी इथेच करणार. काय करायचं ते करा.
मग त्याच्या वरची महिला अधिकारी बाजूच्या दुकानात बसली होती. ती आली. त्या शिपायाला विचारलं काय झाल ? त्याने सांगितलं.  आमची मूर्ती लहान आहे बघून तिने हरकत घेतली नाही.

 मी आणि बाबांनी  आरती केली.नंतर मी विसर्जन केल. कधी नाही ते इतक्या वर्षात मी पहिल्यांदाच स्वतः पाण्यात उतरून विसर्जन केल. एरव्ही विसर्जन करून देणारी मुल असत. ते प्रवाहाच्या मधोमध जाऊन विसर्जन करत. ह्यावर्षी स्वतः केल.

आमच पाहून एक क्वालीस गाडीमधील गणपतीवाले कुटुंब पण आमच्या मागे आले . त्यांनीही तिथेच विसर्जन केल. नंतर अजून ३ जण आले.  निघताना मी त्या पोलिस शिपाई आणि त्याच्यावरील महिला अधिकारी ह्यांना खिरापतीचा प्रसाद दिला व कमी जास्त बोललो असेल तर मनावर घेऊ नका अस हसत हसत म्हणालो. त्यांनीही हसून निरोप दिला  आणि आम्ही निघालो.

विसर्जन वाहत्या पाण्यात करायचे हा नियम  पाळा. विहीर,कुंड,तलाव ह्यात विसर्जन करू नये. हे शक्य नसेल तर पंचधातूची/चांदीची मूर्ती आणावी व तीच दरवर्षी प्राणप्रतिष्ठा करावी. विसर्जनाच्या अक्षता वाहाव्यात मग घासून पुसून ठेऊन द्यावी व पुढच्या वर्षी वापरावी.एकदाच खर्च.  पण जर मातीची(पार्थिव) मूर्ती आणत असाल तर तिचे विसर्जन हे वाहत्या पाण्यातच करावे. 


आपला 
कौस्तुभ गुरव, बदलापूर          
          

No comments:

Post a Comment